भारतात एफडीआय परवानगीचे अमेरिकेकडून स्वागत

वशिंग्टन दि. ८- थेट परदेशी गुंतवणुकीअंतर्गत मल्टी ब्रँड रिटेल ला भारत सरकारने दिलेल्या परवानगीचे अमेरिकेने स्वागत केले असून त्यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मार्क टोनर या संबंधी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की, भारताने दिलेल्या थेट परदेशी गुंतवणूक परवानगी मुळे छोटया उद्योगाना अधिक संधी मिळणार आहे. तसेच शेतकरी, गुंतवणूकदार यांना त्याचा लाभ होईल. पायाभूत क्षेत्रातील सुविधांना अग्रक्रम मिळेल व ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार आहे. भारतातील जनतेला या योजनेमुळे अन्नधान्य रास्त दरात उपलब्ध होणार आहे. तसेच चीन, ब्राझील व अन्य विकसनशील देशांप्रमाणेच भारताचे मार्केटही वाढणार आहे.

थेट परदेशी गुंतवणुकीअंतर्गत अनेक अमेरिकन कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मात्र ही योजना राबवायची की नाही याचा निर्णय प्रत्येक राज्याने स्वतंत्ररित्या घ्यावयाचा आहे. अमेरिकी कंपन्या महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजराथ, तमीळनाडू, पंजाब, बिहार यासारख्या प्रगतशील राज्यात गुंतवणूकीस विशेष उत्सुक असून सुमारे ३५० कंपन्यांचे प्रतिनिधी २०१३ मध्ये या राज्यांना पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.