पालघर मधील मुलींवरची केस लवकरच मागे

मुंबई दि. ८ – फेसबुकवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंद बाबत कांही आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून पालघरमधील दोन मुलींवर दाखल करण्यात आलेली पोलिस केस लवकरच मागे घेतली जाईल आणि त्या संबंधीची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. बोईसर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री आले असता त्यांनी ही माहिती दिली.

पालघरमधील शाहीन ढाडा आणि रिनू श्रीवास्तव या दोन मुलींवर पालघर पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी अटक करून केस दाखल केली होती. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. मात्र अद्यापीही या मुलींच्या घराभोवती पोलिस पहारा आहे. मुख्यमंत्र्यांनी केस मागे घेतली जाईल याची खात्री त्यांना दिली होती .मुख्यमंत्री या दोन्ही मुलींची भेटही घेणार होते मात्र शिवसेनेने काळे झेंडे दाखविले जातील असे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही भेट टाळली असे खात्रीलायक वृत्तानुसार समजते. मुख्यमंत्री बोईसर येथे बोलताना म्हणाले की केस पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पोलिसांनी ती प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान या दोन्ही मुलींनी केस लवकर काढावी आणि घरावरचे पोलिस पहारे उठवावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे समजते.