पं. रविशंकर यांचा अमिताभला फोन

मुंबई दि.७ – आपल्या अद्भूत सतार वादनाने गेली कित्येक वर्षे जनमानसावर भुरळ घातलेले पं. रविशंकर आजारी असून त्यांनी अमेरिकेतून अमिताभ बच्चन यांना फोन करून त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी झालेल्या संभाषणात त्यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांचे काम पार आवडते असे सांगून आशीर्वाद दिल्याचे बच्चन यांनी सांगितले.

अमेरिकेत वास्तव्यास असलेले ९२ वर्षीय पं.रविशंकर गेले कांही दिवस आजारी असून त्यांच्यावर गुरूवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शंकर आणि बच्चन कुटुंबियांचे कित्येक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. मात्र रविशंकर यांनी प्रथमच अमिताभ बच्चन यांना फोन केला असे बच्चन म्हणाले. रविशंकर यांच्या पत्नी सुकन्या यांनी अमिताभ यांच्याशी संपर्क साधून रविशंकर यांना बोलायचे असल्याची इच्छा सांगितली. बच्चन म्हणाले की हा फोन घेताना मी अतिशय भारावून गेलो. माझे वडील आणि रविशंकर आणि अन्य शंकर कुटुंबियांचे जवळचे संबंध होते तसेच माझे रविशंकर यांचा मुलगा, सून तसेच उदयशंकर त्यांची अभिनेत्री कन्या यांच्याशी चांगले संबंध आहेत. कोलकाता येथील संगीत मैफिलीत मी तरूण वयात अनेक वेळा हजेरी लावून रविशंकर यांची सतार ऐकली आहे असेही बच्चन म्हणाले.

Leave a Comment