विधानसभेवर भगवा फडकविणारच: उद्धव ठाकरे

कोल्हापूर: आगामी निवडणुकीत विधानसभेवर भगवा ध्वज फडकवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करणार; असा निर्धार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसैनिकाना भेटण्यासाठी राज्याच्या दौऱ्याचे आयोजन केले असून हा दौरा राजकीय नाही; असा निर्वाळाही त्यांनी दिला.

कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे पत्नीसह दर्शन घेऊन ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याचा प्रारंभ केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

बाळासाहेबांच्या पश्चात पक्षाची सूत्रे आपण हाती घेतले असून बाळासाहेबांची सगळी स्वप्न साकार करण्याचा आपला निश्चय आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आपल्याला साथ द्यावी; असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आता रडायचे नाही तर लढायचे. हिंदू आणि मराठीवर अन्याय सहन करायचा नाही; असेही ठाकरे यांनी सांगितले.

ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मराठी भाषकांवर अन्याय होईल; त्या ठिकाणी शिवसेना प्रतिकरासाठी धाऊन येईल; असा विश्वास कर्नाटकातील सीमावासियांना ठाकरे यांनी दिला.

Leave a Comment