सिंचन श्वेतपत्रिकेला मराठवाड्याचा विरोध

उस्मानाबाद: सिंचनाबाबत राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेतील मार्गदर्शक तत्वांचे अनुकरण केल्यास मराठवाड्याचा विकास रखडेल; असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांनी घेतला आहे. या विषयाबाबत उस्मानाबाद येथे सर्वपक्षीय परिषदेचे आयोजनही करण्यात आले आहे.

जलसंपदा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच ताब्यात असूनही श्वेतपत्रिकेच्या निमित्ताने पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. श्वेतपत्रिकेतील मार्गदर्शक तत्वांचे पालन करायचे ठरविल्यास मराठवाड्याला २५ टीएमसी पाण्याला मुकावे लागेल. त्याचप्रमाणे कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजनेला खीळ बसेल; असे आक्षेप पाटील यांनी घेतले आहेत.

मराठवाड्यात अनेक वर्ष पाठपुरावा करून कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजनेसाठी तीन ठिकाणी बोगद्यांची कामे सुरू आहेत. गोदावरी खोऱ्यात ज्या प्रकल्पांवर २५ टक्क्याहून कमी निधी खर्च झाला आहे; असे ६ कोटी रुपये खर्चाचे ५४ प्रकल्प आहेत. श्वेतपत्रिकेच्या शिफारशीनुसार हे प्रकल्प आणि ५० लघु प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. ४ हजार ६१५ कोटी रुपयांचा कृष्णा मराठवाडा प्रकल्प गुंडाळला जाईल; अशी भीती बीड, उस्मानाबादकरांना भेडसावत आहे.

सातारा जिल्ह्यातील उदयन महाराज भोसले यांनीही श्वेतपत्रिकेवर टीका केली. ज्या प्रकल्पांवर २५ टक्क्यांपेक्षा कमी निधी खर्च झाला आहे; ते प्रकल्प बंद करण्याची शिफारस म्हणजे दुष्काळग्रस्त नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून सरकारने प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून न दिल्यास प्रतिसरकार निर्माण होईल; असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment