बीजिंग: चीनबरोबर भारताच्या नकाशा युद्धानंतर सीमाप्रश्नासह अन्य महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भारताच्या संरक्षण विभागाचे सल्लागार शिवशंकर मेनन तीन दिवसाच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मेनन यांची भेट चीनासाठीही महत्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया चीन प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
चीनमध्ये नेतृत्वबदल झाल्यानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होत आहे. यापूर्वी चीनने व्हिसावर अरुणाचल प्रदेशाचा नकाशा चीनचा भूभाग असल्याचे दाखविणारा नकाशा छापल्याने निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होऊ शकेल; अशी आशा दोन्ही पक्षांना आहे.
मेनन यांची भेट चीनसाठी महत्वपूर्ण असल्याचे चीनच्या प्रशासनाने सांगितले आहे. या भेटीत ली काकीयांग यांच्यासह चीनच्या प्रमुख नेत्यांशी मेनन हे चर्चा करणार आहेत. चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दाई बगुओ यांच्याशी सोमवारी मेनन यांची चर्चा होणार आहे. चीनबरोबर यापूर्वी झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या १५ फेऱ्यांच्या चर्चेचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.
चीनचे भारतीय अभ्यासक प्रा. पी.सी. बागची यांच्या चीनी संस्कृतीविषयक पुस्तकाचे प्रकाशन मेनन यांच्या हस्ते केले जाणार आहे.