शेतकऱ्यांसाठी ‘आम आदमी’चा पुढाकार

मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून सिंचन प्रकरणात सरकारने काढलेली श्वेतपत्रिका ही भ्रष्टाचार लपविण्याची कल्पना आहे; असा आरोप आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी केला. याच संदर्भात ‘आम आदमी’च्या वतीने काळी पत्रिका काढण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

देशातील सर्वाधिक कष्ट शेतकरी आणि मजूर, कामगार करीत असूनही त्यांना न्याय मिळण्यासाठी सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करीत असूनही केवळ पेकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे; असे आरोप केजरीवाल यांनी केले.

ज्या सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गाजावाजा करून राजीनामा दिला; त्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा श्वेतपत्रिकेद्वारे सरकारने निकाल लावला असून अजित पवारांच्या राजकीय पुनर्वसनाचे कामच या माध्यमातून केले जात असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. ज्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत; त्याच महाराष्ट्रात सिंचनाचा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. ही दुरवस्था दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी लोकसभेत जाने आवश्यक असून हे जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत ‘आम आदमी’ शांत बसणार नाही; असा इशाराही केजरीवाल यांनी दिला.

Leave a Comment