जागतिक विचारवंतात मलाला, अण्णा आणि नितीशकुमार

वॉशिंग्टन दि. २७ – फॉरीन पॉलिसी या अमेरिकन मासिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीत भारतातील लोकांची संख्या अधिक असून त्यात भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे प्रणेते अण्णा हजारे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लेखिका अरूंधती रॉय, लेखक पंकज मिश्रा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातील चौदा वर्षीय मलाला युसुफझाई ही सर्वात कमी वयाची विचारवंत म्हणून या मासिकात नोंदली गेली असून तिला यादीत सहावे स्थान देण्यात आले आहे.

या यादीत प्रथम स्थानावर म्यानमारच्या ऑन स्यूकी आणि अध्यक्ष थाई सेन विराजमान असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ११ वे स्थान दिले गेले आहे. बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांचा २० वा नंबर आहे तर वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना ३३ वे स्थान देण्यात आले आहे.

अण्णा हजारे यांची वर्णी ३७ व्या स्थानावर लावण्यात आली असून ७४ वर्षीय गांधीवादी विचारवंताने भ्रष्टाचाराविरोधात दशकाहून अधिक काळ चालविलेले आंदोलन आणि गतवर्षी सत्ताधारी पक्षाचे अनेक घोटाळे उघडकीस आणल्याचा उल्लेख त्यांच्या माहितीत करण्यात आला आहे. गेल्यावर्षात दोन वेळा लोकपाल विधेयकासाठी उपोषण करणार्याय अण्णांना देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद, या मृदूभाषी नेत्याला त्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी लाखो लोकांनी प्रत्यक्ष जमून दिलेला प्रतिसाद याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

केंद्र सरकारातून बाहेर पडून बिहारमध्ये परतलेले आणि २००५ साली विधानसभा जिंकून मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेले नितीशकुमार यांना या मासिकाच्या यादीत ७७ वे स्थान देण्यात आले आहे. जंगल राज, काळे राज्य अशी ओळख असलेल्या बिहार मधील गरीबी, भ्रष्टाचार, गुन्हगारी अशा अनेक मुद्द्यांवर नितीशकुमार यांनी योजलेले उपाय आणि त्यातून साधलेली राज्याची प्रगती यासाठी त्यांना हा मान देण्यात आला आहे. सार्वजनिक  क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढतानाच राज्यात जलदगती न्यायालयांची स्थापना आणि भ्रष्टाचाराबाबत आलेल्या तक्रारी यू ट्यूबवरून सादर करून त्यांनी मोठीच कामगिरी बजावल्याचे यात नमूद केले गेले आहे.