वैष्णोदेवी परिसरात अतिदक्षतेचा इशारा

जम्मू दि.२७ – देशविदेशातील हिंदूचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या वैष्णोदेवीचे मंदिर उडवून देण्यात येणार असल्याची धमकी मिळाल्याने येथील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असून या परिसरात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असल्याचे समजते. मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला दिलेल्या फाशीचा बदला म्हणून हे पवित्र स्थळ उडवून देण्याची धमकी लष्करे तय्यबाच्या सदस्याने कटरा येथील हॉटेल व्यावसायिकाला ईमेल वरून दिली आहे असे समजते. कटरा येथील हॉटेल व्यावसायिक अे.एच. भट यांना आलेला हा ईमल त्यांनी पोलिसांना सूपूर्द केल्यानंतर सुरक्षा वाढविली गेली आहे.

दरम्यान हा ईमेल बंगलोर येथून आल्याचे उघड झाले असून कर्नाटक पोलिसांनी ज्या संगणकावरून हा मेल केला गेला तो जप्त केला आहे. मात्र मेल करणारी व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे बंगलोरचे पोलिस आयुक्त ज्योतिप्रकाश यांनी सांगितले आहे. तर उधमपूर जिल्ह्याचे डीआयजी जगजीतकुमार यांनी मेलची माहिती मिळताच कटरा येथे भेट देऊन वैष्णोदेवी परिसरात नेमण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. ही मेल कदाचित खोडी काढण्यासाठी पाठविलेली असू शकेल पण आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment