बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय उद्धवच घेणार

मुंबई दि.२७ – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक कोठे केले जावे यावरून शिवसेनेतील नेते मंडळी जी चर्चा करत आहेत त्याला पूर्णविराम देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कुठे उभे केले जावे याचा निर्णय कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेतील असे शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतरचे सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल असे सेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ठाकरे कुटुंबिय सध्या शोकसागरात बुडाले असताना स्मारकावरून चाललेली चर्चा थांबविण्याची सूचना मिळूनही सेना नेते जी मते व्यक्त करत आहेत त्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सेनेतील वरीष्ठ नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे असे सांगून या वादाला तोंड फोडले होते. त्यावर दररोज उलटसुलट चर्चा आणि प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ही वेळ चर्चेची नाही असे सांगूनही हा वाद सुरूच आहे असे सांगून नार्वेकर म्हणाले की मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी या संदर्भात समिती नेमून बैठक घेतली आहे. सेना नेते स्मारकासाठी जागा सुचवू शकतील पण या सुचविलेल्या जागांची यादी उद्धव ठाकरे यांना सादर केली जाईल आणि त्यावर अंतिम निर्णय तेच घेतील असेही स्पष्ट करण्यात आले. ही यादी गुरूवारी ठाकरे यांच्याकडे सूपूर्द केली जाणार आहे मात्र त्याचा निर्णय धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल.

नार्वेकर म्हणाले की स्मारक दादर मध्येच उभारले जाईल मात्र त्यासाठी ठराविक जागेचा हट्ट मान्य केला जाणार नाही. याबाबत कुणीही राजकारण करू नये. मनोहर जोशी यांनी सचविलेली जागा हे त्यांचे वैयक्तीक मत असू शकते असेही ते म्हणाले.

Leave a Comment