पुणे: आधार कार्डाद्वारे निवृत्ती वेतन आणि अन्य अनुदानाच्या रकमा थेट नागरिकांच्या खात्यात जमा करण्याच्या योजनेला १ जानेवारी २०१३ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. पहिल्या टप्प्यात १५ राज्यातील ५१ जिल्ह्यात ही योजना राबविली जाणार असून सन २०१३ अखेरपर्यंत संपूर्ण देशभरात ही योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्ती वेतन आणि इतर अनुदानासाठी शासन दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करीत असते. ही रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी आधार योजना हाती घेतल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सोमवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केश ट्रान्स्फर कमिटीची बैठक आयोजित केल्याचेही चिदंबरम यांनी सांगितले.
देशाची अर्थव्यवस्था अजूनही अपेक्षित वेग पकडू शकली नसल्याचे मान्य करतानाच चिदंबरम यांनी दुसर्या सहामाहीत आर्थिक विकास दर ५.५ टक्के असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.