
नवी दिल्ली: २-जी स्पेक्ट्रम अहवालात देशाचे १.७६ लाख कोटी रुपये नुकसान झाल्याचा आकडा नेमका आला कुठून हे नियंत्रक आणि महालेखापालांनीच स्पष्ट करावे; असे आव्हान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी कॅगला दिले आहे. त्यासाठी खुल्या चर्चेचे निमंत्रणही तिवारी यांनी कॅगला दिले आहे.
२- जी स्पेक्ट्रम परवाने ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्वावर देण्यात आल्याने देशाचे १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका कॅगने सरकारवर ठेवला आहे. या अहवालातील आकडे हा कॅगचा केवळ कल्पनाविलास असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. ज्यावेळी सन २०१० च्या मे महिन्यात प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला; त्यावेळी नुकसानाचा आकडा २ हजार ६४५ कोटी रुपये होता. मात्र तो नोव्हेंबरमध्ये संसदेत सदर होईपर्यंत ६ महिन्यात १ लाख ७६ हजार कोटी कसा झाला; असा सवाल तिवारी यांनी केला आहे.
अहवाल तयार करताना लोकलेखा समितीला केगाने मदत करणे योग्य आहे का; असा सवाल करतानाच लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरलीमनोहर जोशी यांनी १ लाख ७६ हजार हा आकडा आला कुठून याचा खुलासा करावा; अशी मागणीही तिवारी यांनी केली.