यंदा वाहन उद्योगातील वाढ थोडी मंदावणार

नवी दिल्ली दि.२२ – यंदाच्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगात सहा ते सात टक्के वाढ नोंदविली जाईल असा अंदाज टाटा मोटर्सने केला असून गतवर्षी ही वाढ ९ ते १० टक्के इतकी होती. म्हणजेच यंदा वाहन उद्योगातील वाढ थोडी मंदावणार आहे असे म्हणता येईल असे कंपनीने उपाध्यक्ष( प्रवासी गाड्या विभाग) नीरज गर्ग यांनी सांगितले. कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन एसयूव्हीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

टाटाने बाजारात आणलेल्या नव्या एसयूव्हीची किंमत १३.९१ लाख रूपये निश्चित करण्यात आली असून गुजराथेत एन्ट्री मॉडेलची किंमत ९.९५ लाख ठरविण्यात आली आहे. गर्ग म्हणाले की गेल्या सात महिन्यात युटिलिटी व स्पोर्ट युटिलिटी वाहन विक्रीत ३१ टक्के वाढ नोंदविली गेली असून ही बाजारपेठ अत्यंत वेगाने वाढते आहे. टाटाने या वर्षात ३० हजार यूव्ही विकल्या असून गेल्या वर्षात ही संख्या ५५ हजार होती. गेल्या चौदा वर्षात कंपनीने ६ लाख यूव्ही विकल्या असून त्यात टाटा सफारीचा वाटा १.२५ लाख गाड्यांचा आहे.

टाटाने पहिली एसयूव्ही १९९८ साली बाजारात आणली होती. गेल्या महिन्यात सफारी स्टॉर्म लाँच करण्यात आली असून १५०० बुकींग आत्तापर्यंत झाली आहेत. गुजराथेत एसयूव्हीची मागणी चांगली असून या वर्षात तेथे किमान २ हजार गाड्या विकल्या जातील असा अंदाजही गर्ग यांनी व्यक्त केला.