नवी दिल्ली: २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ला परतवून लावणार्या झुंजार कमांडोंना निवृतीवेतन आणि वैद्यकीय सुविधांसारख्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेऊन केंद्र सरकार त्यांची करीत असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
२६/११च्या हल्ल्यातील क्रूरकर्मा अजमल कसब याला फासावर चढविल्यानंतर दुसर्याच दिवशी केजरीवाल यांनी कमांडोंचे दु:ख उघड केले आहे. या कारवाईत जखमी झाल्याने निवृत्त झालेला कमांडो सुरेंद्र सिंग यांनी या पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडली.
सिंग यांच्याजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे त्यांची श्रवणशक्ती क्षीण झाली. त्यामुळे वैद्यकीय विभागाने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा पथकातून निवृत्त केले. मात्र त्यांच्या उपचारासाठी संरक्षण विभागाने सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत किंवा उपचाराच्या खर्चापोटी त्यांना आर्थिक सहकार्यही दिले नाही आणि सेवेची १५ वर्ष पूर्ण न कारण दाखवून त्यांना निवृत्तीवेतन नाकारण्यात आले; असा आरोप सिंग आणि केजरीवाल यांनी केला. सिंग यांच्याप्रमाणेच इतर कमाडोही या वंचित असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळविल्याचा दावा सिंग यांनी केला.
दरम्यान; सिंग यांना ३१ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा करून काँग्रेस प्रवक्ता मनीष तिवारी यांनी हे आरोप नाकारले आहेत. मात्र सिंग यांनी आपल्याला आतापर्यंत केवळ ४ लाख रुपये मिळाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.