यंगून दि.१९ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी म्यानमारच्या भूमीवर पाऊल ठेवून म्यानमार मध्ये येणारे पहिले अमेरिकन सर्व्हींग राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. ओबामांना घेऊन येणार्या एअरफोर्स वन चे यंगूनच्या विमानतळावर आगमन होताच एकच जल्लोश उसळला असल्याचे सांगण्यात आले.
अनेक वर्षे जुलमी राजवटीखाली काढलेल्या म्यानमार म्हणजेच बर्मामध्ये आता लोकशाही मार्गाने निवडणूका झाल्या असून लोकशाही प्रणेते सरकार सत्तेवर आले आहे. अध्यक्ष थेन सिंग यांनी देशात अनेक सुधारणावादी कार्यक्रम राबविले असून त्यांना अधिक बळ देण्यासाठी ओबामा येथे आले आहेत. ओबामा यंगून विद्यापीठात भाषण करणार आहेत.
वचन पाळण्यासाठी आपण बर्मात आलो असल्याचे ओबामा यांनी जाहीर केले आहेच पण त्यांच्या भाषणात ते दोस्तीचा हात पुढे करण्यासाठी आपण आलो आहोत व दोन्ही देशांच्या संबंधाचा हा प्रवास आत्ता सुरू होत आहे. प्रसारमाध्यमांवरील बंदी उठणे आणि जनतेला तिचे न्याय हक्क मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ते करणार आहेत असे समजते.
बर्माच्या विरोधी पक्ष नेत्या आन स्यू की यांना जेथे दीर्घकाळ स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते त्या लेक साईड पॅलेसलाही ओबामा स्यूकी यांच्या समवेत भेट देणार आहेत. भाषणात ओबामा बर्मात विकास कामांसाठी अमेरिकेकडून १७० दशलक्ष डॉलर्सची मदत देण्यात येणार असल्याची घोषणाही करणार असून ही मदत दोन वर्षांच्या कालावधीत करण्यात येणार आहे.