साहेब दर्शन द्या- शिवसैनिकांच्या घोषणा

मुंबई दि.१७ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली असताना मातोश्रीवर लोटलेली गर्दी कमी होऊ लागली असली तरी आता तेथे -साहेब दर्शन द्या- या शिवसैनिकांच्या घोषणा घुमु लागल्या आहेत. परिणामी मातोश्रीवरील पोलिस सुरक्षा यंत्रणा बाळासाहेबांची प्रकृती पूर्ण सुधारेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकार्यां कडून समजते.

शुक्रवारी रात्री शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे जाहीर केल्यानंतर साहेब दर्शन द्या ही शिवसैनिकांची मागणी जोर धरू लागली आहे. बाळासाहेबांच्या तब्येतीबाबत सतत कांही ना कांही अफवा पसरत आहेत हे ध्यानात घेऊन मुंबईच्या संवेदनशील भागात पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले आहे. विविध पोलिस स्टेशनमधील १० हजारांवर पोलिस, स्थानिक आर्म डिव्हिजनमधील ५ हजार जवान, शहराबाहेरून मागविले गेलेले २ हजार पोलिस शिवाय जलद कृती दलाच्या तीन तुकड्या आणि राखीव पोलिस दलाच्या तुकड्या इतका फौजफाटा मुंबईत तैनात करण्यात आला असल्याचे समजते.

मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच पोलिस बंदोबस्तात कोणतेही कॉम्प्रमाईज नको असे सक्त आदेश दिले असून कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी कांही शिवसेना नेत्यांनाच सहकार्याचे आवाहन केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment