भारतीय फिरकीपटुंनी इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले आहे. तिस-या दिवशी उपहारानंतर इंग्लंडची अवस्था ८ गडी बाद १७३ अशी झाली होती . फॉलोऑन टाळण्यासाठी इंग्लंडला अजून ३२१ धावाचा टप्पा गाठ्यचा आहे. इंग्लंडचे सात फलंदाज बाद झाल्यानंतर मॅथ्यू प्रायर आणि टीम ब्रेस्नन या जोडीने आठव्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेस्ननला बाद करून ओझाने ही जोडी फोडली.
इंग्लंडवर फॉलोऑनचे संकट
कालच्या ३ बाद ४१ वरून इंग्लंडचा कर्णधार एलिस्टर कूक आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन यांनी इंग्लंडच्या दिवसाची सुरुवात केली. काही काळ दोघांनी कडवा प्रतिकार केला. परंतु, ओझाने भारताला चौथे यश मिळवून दिले. प्रग्यान ओझाने इंग्लंडला लागोपाठच्या चेंडुंवर दोन मोठे धक्के दिले. सर्वप्रथम केविन पीटरसनचा त्याने अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडविला. तर दुस-याच चेंडूवर इयन बेल सचिन तेंडुलकरच्या हाती झेल देऊन परतला. पीटरसनने १७ धावा काढल्या, तर बेल शून्यावर बाद झाला. त्यावेळी इंग्लंडची अवस्था ५ बाद ६९ अशी झाली.
त्यानंतर एकाकी झुंज देणा-या कर्णधार एलिस्टर कूकला अश्विनने ४१ धावांवर बाद केले. त्यानंतर उमेश यादवने इंग्लंडला सातवा धक्का दिला. समित पटेलला त्याने १० धावांवर पायचीत केले. धोनीने काल उमेश यादवला गोलंदाजी दिली नव्हती. आज पहिल्याच षटकात त्याने पटेलला बाद केले. इंग्लंडचे ८ फलंदाज तंबुत परतले असून फॉलोऑनचे दाट सावट संघावर आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी इंग्लंडला ३२१ धावा काढायच्या आहेत. ब्रॉडने शेवटी फटकेबाजी करून काही झटपट धावा जमवून प्रतिकार मोडून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा तो २० धावावर खेळत होता.
