सिंहगर्जना लोपली – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब अनंतात विलीन

मुंबई दि. १७ – शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत आज दुपारी मालविली. ते ८६ वर्षांचे होते. गेले कांही दिवस श्वसनाच्या त्रासामुळे ते आजारी होते. गेले दोन दिवस त्यांची तब्येत अधिक बिघडली होती आणि तज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर उपचारांसाठी चोवीस तास सज्ज होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ.जलील पारकर यांनी बाळासाहेब गेल्याचे थोड्या वेळापूर्वी जाहीर केले आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र असलेल्या बाळासाहेबांचा जन्म १९२६ सालचा. व्यंगचित्रकार म्हणून इंग्रजी दैनिक फ्री प्रेस जर्नल मधून आपल्या करियरची सुरवात त्यांनी केली. सहा वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचे मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. बाळासाहेबांचा राजकारणात प्रवेश होण्यात मार्मिकचा सहयोग मोठा होता. १९६६ मध्ये दसर्याबला त्यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा शिवाजी पार्कवर झालेल्या प्रचंड दसरा मेळाव्याला सेनेच्या सैनिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

महाराष्ट्रात बाळासाहेबांसारखा करिश्मॅटिक नेता झाला नाही हे त्यांचे विरोधकही खुलेपणाने मान्य करत असत. शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात मुंबईत येऊन मराठी माणसांच्या नोकर्यां वर गदा आणणार्याे गुजराथी आणि दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले होते. त्यानंतर उत्तर भारतीयांच्याबाबतीतही त्यांनी हेच धोरण राबविले होते. मराठी माणूस किवा भूमीपुत्र म्हणून मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्यांच्यातील लढवय्या जागा करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांनी केले. आपले अफाट वकृत्व, देशप्रेम, मराठी माणसासाठी मनात असलेली कळकळ आणि प्रखर हिैंदूत्व यामुळे ते हिंदूहृदय सम्राट कधी बनले हे कोणालाच कळाले नाही.

मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी अवघे आयुष्य वेचलेल्या बाळासाहेबांनी आपल्या दैनिक सामना मधून सातत्याने गैरप्रवृत्तींवर घणाघाती टिका केली. राजकारणी लोकांचा आवडता पेहराव खादी त्यांनी कधीच वापरली नाही. उलट त्या काळातही हातात पाईप, डोळ्याला गॉगल आणि कुर्ता सुरवार अशा झोकदार पोशाखात ते वावरत असत.मराठी माणसाला सतत जागे करण्याच्या प्रयत्नातून भाजपशी युती करून महाराष्ट्रातील सत्ता युतीच्या हाती देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. बाबरी मशीद, १९९३ सालच्या जातीय दंगली यातही आपली भूमिका निर्भयपणे मांडून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांनी केले.

शिवराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले बाळासाहेब आज अनंतात विलीन झाले आणि लाखो करोडो डोळ्यांनी आपल्या अश्रूंना मुक्त वाट करून दिली. मराठी माणूस आज पोरका झाला. बाळासाहेबांच्या मागे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे असे दोन पुत्र आहेत.

Leave a Comment