इस्लामाबाद दि.१५- मलाला युसुफझाईला सोमवारी पहाटे पुढील उपचारांसाठी विशेष विमान अॅम्ब्युलन्समधून ब्रिटनला हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे. गेल्या गुरूवारी तालिबानी तेहरीक ए तालिबान या संघटनेने तालिबान विरोधात बोलल्याबद्दल मलालाच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर तिच्यावर रावळपिंडी येथे उपचार करून नंतर तिच्यावर पेशावर येथील लष्करी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिच्या मानेत घुसलेली गोळी बाहेर काढण्यात आली आहे. मात्र त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले होते. तिची प्रकृती अत्यंत संथ गतीने सुधारत आहे.
मलालाची उपचारांसाठी ब्रिटनला रवानगी
अखेरी रविवारी रात्री तिला उपचारांसाठी ब्रिटनला हलविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आणि सोमवारी सकाळी तिची ब्रिटनला रवानगी करण्यात आली. रविवारी कराची येथे मलालासाठी हजारो लोकांनी एकत्र जमून प्रार्थना केली. सर्व जगभरातून मलालावरील हल्ल्याचा निषेध केला जात असताना पाकिस्तानातही तालिबान्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.
कराचीतील मुलींच्या शाळेचा विस्तार करण्यात आला असून शाळेचे नामकरण मलाला युसुफझाई गव्हर्नमेंट गर्ल्स सेकंडरी स्कूल असे ठेवण्यात आले आहे. या शाळेतील मुलींनी मलालावरील उपचारांसाठी ५० हजारांचा निधी गोळा करून तो मलालाच्या मात्यापित्यांकडे सूपूर्द केला आहे.
