तुमचे डोळेच बनणार तुमचा पासवर्ड

न्यू यॉर्क दि.१५- भारतात युनिक आयडेंटिफिकेशन नंबरसाठी चालविण्यात येत असलेल्या मोहिमेत नागरिकांच्या डोळ्यांचे स्कॅनिग करण्यात येत आहे. यावरूनच प्रेरणा घेऊन अमेरिकेतील संगणक शास्त्रज्ञ ओलेग कामोगार्टसेव्ह यांनी डोळ्यांची बायोमेट्रिक सिस्टीम विकसित करण्याविषयी संशोधन सुरू केले आहे. टेक्सास विद्यापीठात कार्यरत असलेले ओलेग यांच्या मते जगातील कोणतीही दोन माणसे एकाच नजरेने एका वस्तूकडे पाहू शकत नाहीत. उदाहरण द्यायचे तर एखादे चित्र पाहतानाही दोन माणसे ते सारख्याच नजरेने पाहात नाहीत. तर प्रत्येक जण आपल्या आवडीचे बिंदू प्रथम पाहतो आणि त्यानुसारच त्याच्या डोळ्यांची हालचाल होते. यासंबंधीचा अहवाल लाईव्ह सायन्समध्ये प्रसिद्धही करण्यात आला आहे.

बायोमेट्रिक म्हणजे जिवंत प्राण्याच्या शरीराचे मेजरमेंट. उदाहरणार्थ माणसाच्या बोटांचे ठसे. जगभरात आता बोटांच्या ठशांवरून माणसाची ओळख पटविण्याची पद्धत वापरली जात असून अनेक गुन्ह्यांची उकलही ठशांवरून करण्यात येते. संगणक, स्मार्टफोन, टॅब्लेट वापरताना पासवर्ड द्यावा लागतो मात्र कोणीही हा पासवर्ड शोधून काढून संगणकातील आपली माहिती चोरी शकतो, खराब करू शकतो अथवा नष्ट करू शकतो. अशावेळी आपले डोळे हाच पासवर्ड करता आला तर या सर्वच अडचणींतून सुटका होऊ शकते असा विचार ओलेग यांच्या मनात आला आणि त्यांनी त्यावर संशोधन सुरू केले तेव्हा ही बाब शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अर्थात ओलेग यांच्या म्हणण्यानुसार त्यासाठी अधिक संशोधन गरजेचे आहे पण नजिकच्या भविष्यात डोळे पासवर्डचे काम नक्की करतील. आज दुबईसारख्या ठिकाणी विमानतळावर तर कांही खासगी कंपन्यांतही बायोमेट्रिक ओळख म्हणून डोळ्यांचे स्कॅनिंग केले जाते. ओलेग करत असलेल्या संशोधनात डोळ्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जातात आणि संगणक या हालचाली अनेलाईज करून संगणक वापरणारी व्यक्ती ओळखू शकतो. यात डोळ्यांच्या स्नायूंची ताकद, डोळ्याभोवती फॅट किती आणि फ्लेश किती याचेही विश्लेषण केले जाते असे त्यांचे म्हणणे आहे.