फिरोजच्या चौकशीस पुणे पोलिसांना मनाई

पुणे दि.१५ – दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पुण्यात इंडियन मुजाहिद्नीनचा सदस्य सय्यद फिरोज याला आणून कॅम्प पोलिस चौकीत ठेवले मात्र पुणे शहर पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांना त्यांची चौकशी करण्यास मज्जाव केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. फिरोज पुणे बॉम्बस्फोटांशी संबंधित आरोपी आहे. दिल्लीहून चार पोलिस उपनिरीक्षक आणि दोन पोलिस असलेल्या पथकाने फिरोजला पुण्यात आणले आणि रविवारी मुंबईमार्गे परत दिल्लीला नेले असेही सांगण्यात येत आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिस पथकाने फिरोजच्या दोन कपडयाच्या दुकानांची तसेच वर्कशॉप आणि त्याने तीन महिन्यांसाठी भाडे करारावर घेतलेल्या फ्लॅटची झडती घेतली. फिरोजला रात्रभर कन्टोन्मेंट पोलिस चौकीत बंद करण्यात आले होते व तेथे दिल्ली पोलिस पथकाचा रात्रभर पहारा होता. सायंकाळी पुणे शहर गुन्हा अन्वेषण विभाग व दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी फिरोजला प्रश्न विचारण्यासाठी चौकीत प्रवेश केला तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल साहेबांनी फिरोजला कुणाशीही बोलू न देण्याच्या कडक सूचना दिल्या असल्याचे सांगून त्याची चौकशी करण्यास या अधिकारयांना मनाई केली.

गणेशोत्सव काळातही दिल्ली पोलिसांचे एक पथक पुण्यातील लॉजमध्ये उतरल्याची खबर मिळाल्यावरून पुणे पोलिसांनी त्या लॉजवर छापा टाकून त्यांना चौकीत नेले होते. मात्र त्यावेळीही आपण प्रवासी आणि व्यापारी आहोत अशी बतावणी त्यांनी केली होती. मात्र अखेर चौकीत नेल्यानंतर मात्र दिल्ली पोलिसांनी आपली खरी ओळख देऊन एका खुनाच्या तपासासाठी येथे आल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र हे पथक फिरोजवर वॉच ठेवण्यासाठीच आले होते असे समजते. त्यावेळी एका पोलिसाने व्यापारी असल्याचे सांगून व फिरोजकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करायचा असल्याचे सांगून त्याच्या नोकराकडून फिरोजचा मोबाईल नंबर मिळविला होता व नंतर लगेचच फिरोजला अटक करण्यात आली असेही या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Leave a Comment