अमेरिकेतील बेरोजगारी घटली

वॉशिंग्टन दि.६ – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यंदा प्रथमच अमेरिकेतील बेरोजगारी घटली असल्याचे दिसून येत आहे. बेरोजगारीचे हे प्रमाण ८.१ टक्क्यावरून सप्टेंबरमध्ये ७.८ टक्क्यावर आले आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकर्‍या मिळण्याचे प्रमाण या काळात कमी झाले असले तरी अन्य सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. सरकारी नोकर्‍यात कपात सुरू असली तरी याही क्षेत्रात सुमारे १० हजार नोकर्‍या उपलब्ध झाल्या असून उत्पादन, बांधकाम अशा क्षेत्रातून १ लाखांच्यावर रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.

ओबामा यांनी आपल्या निवडणूक प्रचार फेर्‍यांतून या बाबीचा अभिमानाने उल्लेख केला असून अमेरिकी जनतेने रिपब्लीकन इकॉनॉमीकडे वळू नये असेही सांगितले आहे. डेमोक्रेटीक सत्तेखाली अमेरिकेची अर्थव्यवस्था अगदी याग्य वळणावर असल्याचेही त्यांनी प्रचारात नमूद केले आहे. ओबामांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर एकटया मे महिन्यातच सुमारे ८ लाख जणांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या होत्या मात्र त्यानंतर गेल्या अडीच वर्षात ५२ लाख नव्या नोकर्‍यांच्या संधी अमेरिकन जनतेपुढे खुल्या झाल्या असल्याचे दिसून आले आहे. अर्थात कंत्राटी कामगारांची संख्या मात्र या काळात रोडावली असल्याचेही दिसून आले आहे.