अमेरिकन नागरिकांना दक्षतेचा इशारा

इस्लामाबाद दि.८ – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे असलेल्या अमेरिकन नागरिकांना सावधानतेचा इशारा अमेरिकन दूतावासाकडून देण्यात आला असून शहरातील कांही भागात या नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना दूतावासाच्या वेबसाईटवरून देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी अधिकार्‍यांनी अमेरिकन नागरिकांवर दहशतवादी हल्ले होण्यची शक्यता असल्याचे सूचित केल्यावरून या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्लामाबाद शहरातील महत्त्वाची सरकारी कार्यालये असणारा रेड झोन तसेच मारियट, सेरेना, हॉली डे, बेस्ट वेस्टर्न, मार्गाला मोटेल या हॉटेल्सवरही दहशतवादी हल्ला होण्याची सूचना देण्यात आली असल्याने दूतावासाने अमेरिकन नागरिकांनी या भागात जाणे टाळाण्याच्या तसेच दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाकिस्तानी अधिकार्‍यांकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नसला तरी पाकिस्तानात अमेरिकाविरोधी मत वाढत चालल्याचे त्यांनी मान्य केले आहे. अमेरिकेकडून सातत्याने होत असलेले द्रोण हल्ले, तसेच नाटो रसद मार्ग पुन्हा खुला करण्यात आल्याबद्दल पाकिस्तानमध्ये असंतोष असल्याचे व त्यातूनच दहशतवादी हल्लयांची भीती असल्याचे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.