भारताप्रमाणेच पाकिस्तान आणि बांगला देशातही भरपूर भ्रष्टाचार आहे. शेवटी हे दोन देश म्हणजे भारताची भावंडेच आहेत. त्यामुळे भारताप्रमाणे तेथेही अप्रतिहत भ्रष्टाचार सुरूच आहे. त्याचाच परिणाम म्हणून बांगला देशातील कापड गिरणीचे सर्वात श्रीमंत मालक तन्वीर महमूद आणि त्यांचा जावई तुषार अहमद यांना अटक करण्यात आली आहे. ढाका शहराच्या मिरकूर भागात या दोघांना काल रात्री पोलिसांनी चतुर्भूज करून नेले.
उद्योगपती तन्वीर महमूद यांनी बांगला देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणार्या सोनाली बँकेतून बेकायदारित्या प्रचंड मोठ्या रकमा उचलल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी उचललेल्या १९ कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास १ हजार कोटी रुपयांचा छडा लागला आहे. आणखी किती पैसे उचलले गेले आहेत याचा शोध सुरू आहे. तन्वीर महमूद यांचा हॉलमार्क ग्रुप असा मोठा उद्योग आहे. परंतु तो गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांनी सोनाली बँकेतील अधिकार्यांशी संगनमत करून पैसा उचलला. त्यामुळे बँकेच्या २७ अधिकार्यांनाही अटक करण्यात आलेली आहे.
या प्रकरणाचा भंडाफोड तिथल्या संसदेत झाला आणि त्यानंतर सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने केलेल्या चौकशीतून भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले. तन्वीर महमूद यांनी पैसे उचलल्याचे कबूल केले. परंतु आपण हे पैसे व्यवसायातच वापरलेले आहेत, अशी सारवासारव सुरू केली. आपण हे पैसे परत करू, असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु चौकशी पथकाला ही गोष्ट पटली नाही.
बँकेच्या अधिकार्यांनी बेकायदारित्या कर्जे दिली, परंतु नंतर हे पैसे वसूल करण्यासाठी तन्वीर महमूद यांच्या काही जमिनी जप्त करण्याची कारवाई केली. परंतु त्यातून बेकायदा कर्जाची वसुली झाली नाही आणि बँकेच्या अधिकार्यांनी केलेला गुन्हा काही लपला नाही. या प्रकरणाचा बभ्रा होऊन सुद्धा बँकेचे अधिकारी जवळजवळ दोन वर्षे मूग गिळून बसले होते. सरकारने कारवाई सुरू केल्यास बँकेने हालचाली सुरू केल्या. बँकेचे हे वर्तन सुद्धा संशयास्पद आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काही वरिष्ठ संचालकांना सुद्धा अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.