महिनाअखेरी न्यू टीम अण्णाची घोषणा

पुणे दि. ९- नवीन टीम अण्णाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून या महिनाअखेर दिल्लीतील राजघाटावर अण्णा हजारे या टीम सदस्यांची घोषणा करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. देशभरातून या टीमसाठी ५० जणांची निवड करण्यात आली असून १००० कार्यकर्तेही देशभरातून आलेल्या अर्जातून निवडले गेले आहेत असे समजते. या नव्या टीममध्ये निवृत्त लष्करी अधिकारी, आएएस, आयपीएस, इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि वकीलांचा समावेश आहे . निवडण्यात आलेल्या कार्यकर्त्यांत २५० जण महाराष्ट्रातील आहेत. 

अण्णांनी आवाहन केल्यानुसार देशभरातून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि लोकपाल बिल आंदोलनात सहभागी होण्यासाठी अक्षरशः लाखो अर्ज आले होते. त्यातील प्रत्येक अर्जाची तपासणी, संबंधित व्यक्तीचे चारित्र्य यांची खातरजमा करण्यात आली असून अण्णांनीच ही अंतिम यादी तयार केली असल्याचे त्यांचे सहकारी दत्ता आवारी यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल आणि अण्णांमध्ये दुरावा आल्यानंतर नवीन टीमची घोषणा करण्यापूर्वी अण्णांनी पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यात नरेंद्र दाभोळकर, माधव गाडगीळ, विश्वंभर चौधरी, अविनाश धर्माधिकारी असा अनेकांचा समावेश होता. नव्या टीमचे नवे योद्ध्यांची यादी जाहीर करण्याच्या मूडमध्ये अण्णा आहेत असे विश्वंभर चौधरी यांनी सांगितले. अनेकांशी केलेल्या चर्चतून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालविण्यासाठी राजकीय पक्ष स्थापनेपेक्षा चळवळच अधिक उपयुक्त असल्याचे अण्णांना पटले आहे असे सांगून त्यांनी गेले दोन महिने आलेल्या अर्जांची छाननी आणि तपासणी करण्याचे काम सुरू होते असेही सांगितले.

दरम्यान अण्णा हजारे यांच्यावर आज मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जात असून भेटीस येणार्‍यांचा त्रास कमी करण्यासाठी रूग्णालयात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेले आठ दिवस अण्णा याच रूग्णालयात विश्रांती घेत आहेत असे राळेगणमधील त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितले.