कधीच कर्तव्य नाही

आपल्याला यंदा कर्तव्य नाही, ही पाटी वाचण्याची सवय झालेली आहे. परंतु जगभरामध्ये आणि विशेष करून औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांमध्ये मुलींनी आपल्या घरांवर, कधीच कर्तव्य नाही अशा पाट्या लावायला सुरुवात केली आहे.

एक जमाना असा होता की, मुलींचे बाप वर संशोधनासाठी चपला झिजेपर्यंत फिरत रहायचे आणि एखाद्या मुलाच्या स्थळाची चौकशी करायचे तेव्हा मुलाच्या आई-बापाकडून यंदा कर्तव्य नाही असे सांगितले जायचे. तेव्हा हा वधूपिता फार निराश व्हायचा. आता स्थिती उलटी झाली आहे. मुले लग्नाला उत्सुक आहेत, परंतु मुली मात्र लग्नाला उत्सुक नाहीत. ब्रिटनमध्ये लग्नाळू मुलांवर निराश होण्याची वेळ आली आहे. 

कोणतीही बाई किवा तरुणी आई होण्यास उत्सुक असते. एखाद्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करावा, त्याला लहानाचे मोठे करावे अशी आंतरिक इच्छा प्रत्येक बाईच्या मनात असते. तशी ती ब्रिटनमधल्या मुलींमध्येही दिसत आहे. परंतु त्यांचा एक मार्मिक प्रश्न सर्वांनाच अस्वस्थ करत आहे. मुलगा हवा आहे किवा मुलगीही चालेल, आई होण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी कोणाशी तरी लग्न करून त्याची बायको होण्याची गरज आहेच का, हा तो प्रश्न होय. याचा उघड अर्थ असा आहे की, ब्रिटनसारख्या देशातील मुलींना लग्न नको आहे. लग्न होणे म्हणजे यशस्वी जीवन, ही कल्पना त्यांना मान्य नाही. 

ब्रिटनमध्ये एका संस्थेने १२०० मुली आणि ६०० मुलांची एक चाचणी घेतली, तेव्हा हे दिसून आले. मुलांनी लग्न, संसार या गोष्टी जीवनात आवश्यक असतात असे मोठ्या प्रमाणावर सांगितले. पण मुलींना मात्र ही कल्पना मान्य नाही. फार कमी मुली मुलांच्या या म्हणण्याशी सहमत झालेल्या दिसल्या. एकूण काय की, ब्रिटनसारख्या देशातील विवाहसंस्था आणि कुटुंब व्यवस्था यांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार चितित झालेले आहे. काही समाजशास्त्रज्ञांच्या मते मुली करिअरच्या मागे लागल्यामुळे असे घडत आहे. त्यांना करिअरपुढे संसार नकोसा झाला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात लग्न करून संसार थाटणार्‍यांची संख्या घटलेली दिसेल. 

२०५० सालपर्यंत अशी स्थिती आलेली असेल की, लग्न करून संसार करणारी दांपत्ये समाजामध्ये अल्पसंख्यक ठरलेली असतील. या निष्कर्षामुळे जुन्या पिढीतील ब्रिटीश लोक अस्वस्थ झाले आहेत. परंतु याही निष्कर्षाचा वापर काही राजकीय नेते सरकारच्या विरोधात करत आहेत. या सरकारला सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यात अपयश आले आहे, अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे. 

 

Leave a Comment