स्वतःची चारचाकी गाडी असावी अशी इच्छा असणार्या सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि मस्त कार पुढील दोन वर्षात उपलब्ध होत असून जपानी ऑटो कंपनी निस्सान यांनी डॅटसन नावाची ही कार तयार केली आहे. ती तीन हजार डॉलर्स म्हणजेच १ लाख ६६ हजार रूपयांत ग्राहकांना मिळू शकणार आहे. सर्वसामान्यांना स्वस्त कारचे स्वप्न दाखविलेल्या टाटांनी त्यांची नॅनो ही कार अवघ्या १ लाख रूपयांत उपलब्ध करून दिली होती मात्र आता याच कारची किमत दोन लाखांवर गेली आहे. त्यामुळे निस्सानही डॅटसन सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जाणार आहे.
जगभरातील कार उत्पादक कंपन्या आलिशान सेदान कार्सची विविध मॉडेल्स बाजारात आणत असतानाच छोट्या कारसाठीही बाजारपेठ आकर्षक असल्याचे कार उत्पादकांच्या लक्षात आले आहे. मारूतीची नवी अल्टो ८०० त्याच दृष्टीने बाजारात आणली गेली असली तरी तिची किमत अडीच लाखांपर्यंत आहे. निस्सानचे सीईओ कार्लोस यांच्या मते भारत, इंडोनेशिया आणि रशिया या देशांत छोट्या कारसाठी चांगल्या संधी आहेत. त्यामुळे डॅटसन ही छोटी कार सहा मॉडेल्समध्ये तयार केली जात असून त्याची किमत ३ ते ६ हजार डॉलर्सच्या दरम्यान असेल.२०१४ साली ही कार बाजारात दाखल होणार आहे.