नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीवरून भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात आकांडतांडव करीत असताना; देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी थेट विदेशी गुंतवणूक आवश्यक असल्याचे विधान करून खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पक्षाला घराचा आहेर दिला आहे.
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीवरून भारतीय जनता पक्ष सरकारच्या विरोधात रान उठविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र यापूर्वीच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आभाळ कोसळणार नाही; असे सांगून पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध मत व्यक्त केले होते. आता पक्षाध्यक्ष गडकरी यांनीही पक्षाच्या भूमिकेला छेद देत थेट विदेशी गुंतवणुकीची आवश्यकता प्रतिपादन केली.
पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ गडकरी यांनी भांडवलाअभावी मरणासन्न अवस्थेला पोहोचलेल्या भारतीय उद्योगांचा दाखलाही त्यांनी दिला.
दरम्यान सूरजकुंड येथील पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत; पक्ष कार्यकर्त्यांनी कमी बोलावे आणि अधिक काम करावे; या अपेक्षेचा गडकरी यांनी या कार्यक्रमात पुनरुच्चार केला. पक्षाच्या भल्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कामावर भर द्यावा आणि दिखाऊपणा आणि चापलुसीपासून दूर राहावे; असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे जनतेचा सरकार आणि काँग्रेसवरचा विश्वास उडाला आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा घेऊन काँग्रेसला समर्थ पर्याय म्हणून भाजपला उभे करायचे असेल तर कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याला पर्याय नाही; असेही गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.