नवी दिल्ली: एका घरात एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना तुरुंगवासही भोगावा लागेल; असा इशारा पेट्रोलियम मंत्रालयाने दिला आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीही मंत्रालयाने जाहीर केल्या असून त्या अनुदानित सिलेंडरपेक्षा सुमारे ५०० रुपयांनी अधिक असणार आहेत.
एका घरात एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून त्यासाठी संबंधितांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो; असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्यांच्याकडे अधिक कनेक्शन्स असतील अशा ग्राहकांनी दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत केवायसी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. जे ग्राहक असा अर्ज दाखल करणार नाहीत; अशा ग्राहकांची सर्व कनेक्शन्स बंद करण्यात येतील आणि अशा ग्राहकांची माहिती सर्व वितरक आणि कंपन्यांच्या ट्रान्स्परन्सी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. कनेक्शन पुन्हा चालू करण्यापूर्वी कडक कारवाईला सामोरे जावे लागेल; असा इशारा पेट्रोलियम विभागाने दिला आहे.
दरम्यान विना अनुदानित सिलेंडरच्या किंमती कंपन्यांनी निश्चित केल्या असून त्यासाठी दिल्लीत ८९० रुपये; कोलकात्यात ८९२ रुपये, मुंबईत ९१४ रुपये, चेन्नईत८७७ आणि भोपाळमध्ये ९४३ रुपये मिजावे लागणार आहेत.