नवी दिल्ली: नव्याने स्थापना होत असलेला पक्ष हा माझा किंवा आमचा पक्ष नाही; तर तो तुमचा; किंबहुना आपला पक्ष आहे; असे सांगत सर्वसामान्य माणसांच्या भावनांना आवाहन करीत अरविंद केजरीवाल यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे बारसे दि. २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देशातील महत्वाच्या २ बड्या हस्तींचा पोलखोल दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार असल्याचा इशाराही केजरीवाल यांनी यावेळी दिला.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल यांनी पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. सरकार आमचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याने नाईलाजाने राजकारणात यावे लागत असल्याचा पुनरुच्चार केजरीवाल यांनी यावेळी केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये ‘मै हू अन्ना’ लिहिलेली गांधी टोपी प्रचलित झाली होती. पक्ष स्थापनेची घोषणा करताना केजरीवाल आणि कार्यकर्त्यांनी ‘मै हू आम आदमी’ असे लिहिलेली गांधी टोपी परिधान केली होती.
आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणांची ओळख यावेळी केजरीवाल यांनी करून दिली. या पक्षाचे लोकप्रतिनिधी शासकीय निवासस्थान, लाल दिव्याची गाडी अथवा शासकीय सुरक्षा व्यवस्था स्वीकारणार नाहीत. हा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर चालणारा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असेल. राजकीय पक्षाच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालवून राजनैतिक क्रांती घडवून आणणे हे आमचे ऊद्दीष्ट असेल. हा पक्ष सत्तेवर आल्यास सत्तेवर जनतेचे थेट नियंत्रण असेल. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे भाव जनतेच्या परवानगीखेरीज वाढणार नाहीत. जनतेच्या इच्छेविरुद्ध जमीन अधिग्रहित केली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. शिक्षण आणि आरोग्यसुविधांचा लाभ समाजाच्या तळापर्यंत सहज उपलब्ध असेल. निवडणुकीत उमेदवाराला नाकारण्याचा मतदारांना हक्क, भ्रष्टाचारी अथवा निष्क्रिय लोकप्रतिनिधीला परत बोलाविण्याचा अधिकार आणि भ्रष्टाचार निर्मूलन हे पक्षाच्या प्राधान्याचे विषय असतील; अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली.