आर्थिक सुधारणाविरोधी ठरावाला द्रमुकचा पाठींबा: करुणानिधी

चेन्नई: विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा विषयक निर्णयांच्या विरोधात संसदेत ठराव मांडला तर द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष या ठरावाला पाठींबा देईल; मात्र त्यामुळे द्रमुक आणि काँग्रेस यांच्या संबंधात दुरावा येणार नाही; अशी भूमिका द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी मांडली.

पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीनंतर करुणानिधी पत्रकारांशी बोलत होते.

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता, डीझेल दरवाढ, अनुदानित सिलेंडरच्या संख्येवर निर्बंध हे निर्णय जनता विरोधी असून या निर्णयांच्या विरोधात विरोधकांनी संसदेत ठराव मांडल्यास पक्ष त्याला पाठींबा देईल; असे करुणानिधी यांनी स्पष्ट केले. या निर्णयांना पक्षाने आपला विरोध वारंवार केंद्राकडे व्यक्त केला असून पंतप्रधान मनमोहन सिंग या निर्णयाचा पुनर्विचार करतील; अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या जनता विरोधी निर्णयांना आपला विरोध असला तरीही जातीयवादी शक्तींना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसशी असलेले सहकार्याचे संबंध पक्ष कायम राखेल; असेही करुणानिधी यांनी स्पष्ट केले.