युनायटेड ब्रेव्हरीज ग्रुपचे अध्यक्ष आणि किंगफिशर एअरलाईनचे सर्वेसर्वा उद्योगपती विजय मल्या यांनी किंगफिशर विमान कंपनीला झालेले ७५०० कोटी रूपयांचे कर्ज कमी करण्यासाठी त्यांची युनायटेड स्पिरीटस कंपनी डिअॅजिओला विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मल्या यांनी ही गोष्ट उघड केली असली तरी डिअॅजिओ योग्य किंमत देणार असेल तरच हा व्यवहार केला जाईल असाही खुलासा केला आहे.
विजय मल्या यावेळी म्हणाले की भारतासारख्या देशांत, २८ शहरांत ब्रेव्हरीजचा व्यवसाय चालविणे ही परदेशातील कोणत्याच कंपनीसाठी सोपी गोष्ट नाही. हा व्यवसाय चालवायचा तर माझीच गरज आहे. स्कॉटीश आणि न्यू कॅसलने युनायटेड ब्रेव्हरीजचे स्टेक घेतले आणि त्यातून बरीच संपत्ती निर्माण झाली. हायकेनच्या संयुक्त प्रकल्पातूनही पैसा उभा राहिला आहे. त्यादृष्टीनेच डिअॅजिओशी बोलणी सुरू आहेत. भूतकाळात डोकावले तर बर्जर पेंटस आम्ही घेतली.
गेली ३१ वर्षे व्यवसायात असलेले मल्या म्हणाले की किंगफिशर अडचणीत असली तरी आम्ही व्यवसायातून बाहेर पडणार नाही. केंद्राने नुकतीच विमान वाहतूक व्यवसायातही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. त्या दृष्टीने आम्ही जागतिक विमान कंपन्यांशीही बोलणी करत आहोत तसेच इंडियन गुंतवणुकदारांशीही संपर्क करत आहोत. आमच्याकडे सध्या चाळीस विमाने आहेत. त्यांच्या फेर्या लवकरच वाढविण्यात येतील. किंगफिशरला तोटा होण्यामागे अन्य घटकही कारणीभूत आहेत. इंधनात जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे आणि त्याचवेळी रूपयाचे अवमूल्यनही झाल्याने तोटा वाढला आहे. एअरबसकडून आम्ही कांही विमाने मिळण्यासाठी ऑर्डर दिली होती आणि त्या कंपनीच्या कांही अंतर्गत अडचणींमुळे आम्ही ही ऑर्डर रद्द करू शकलो नाही.
किंगफिशरला सध्या ७५०० कोटींचे कर्ज असून सरकारला सर्व्हीस टॅक्सपोटी कंपनी ६० कोटी रूपये देणे लागते असे समजते.