फार्मसीचे शिक्षण समाजोपयोगी

pharma

विज्ञान शाखेचे विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि आय.टी. क्षेत्राच्या मागे लागतात. परंतु त्यातले काही विद्यार्थी फारच नाईलाज झाला आणि कोठेच प्रवेश मिळेनासा झाला की मग निरुपाय होऊन फार्मसीकडे प्रवेश घेतात. या शाखेला औषध निर्माण शास्त्र असे म्हणतात. या शाखेचे शिक्षण अतीशय महत्वाचे आहे पण तेवढेच ते उपेक्षित राहिलेले आहे. फार्मासिस्टला समाजात प्रतिष्ठा तर नाहीच, पण फार्मासिस्टची कामे असतात तरी काय काय हे सुद्धा लोकांना माहीत नाही. फार्मासिस्ट म्हणजे औषधाच्या दुकानातला चिठ्ठ्या वाचून औषधे देणारा नोकर एवढ्यापर्यंतच सामान्य माणसाचे फार्मासिस्ट विषयीचे ज्ञान मर्यादित आहे.

बर्‍याच लोकांना फार्मासिस्टची कामे याच्या पलीकडे खूप असतात याची मुळात माहितीच नाही. त्यामुळेच विज्ञान शाखेत बारावीच्या वर्गात फार कमी गुण असलेले विद्यार्थी शेवटचा उपाय म्हणून इकडे शिरतात. हा एक उपयुक्त अभ्यासक्रम आहे याची लोकांना माहिती नाही, पण तो तसा आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी निदान लाख, सव्वा लाख रुपये खर्च येतोच. कारण हा अभ्यासक्रम खर्चिकच आहे. म्हणजे अभ्यासक्रमाला प्रतिष्ठा नाही, पण फी मात्र भरपूर. त्यामुळे तर या विद्याशाखेला येण्याचे सर्व लोक टाळतातच. मात्र फार्मासिस्ट हा चांगला कंपाउंडर असतो. डॉक्टर म्हणतात त्या प्रमाणे औषधे तयार करणे, औषधांची मिश्रणे बनवणे हे त्याचे काम असते. ही औषधे बनवताना त्यासाठी वापरल्या जाणार्‍या घटकांची माहिती त्याला असते. त्याशिवाय औषध मुळातच संशोधन करून तयार करणे किंवा नवनव्या औषधांचा शोध लावणे हेही फार्मासिस्टचेच काम असते. म्हणून फार्मासिस्टना केवळ कंपाउंडर म्हणून किंवा औषधाच्या दुकानातला सेल्समन म्हणूनच नोकर्‍या मिळत असतात असे समजण्याचे काही कारण नाही.

 विशेषतः फार्मसीच्या अभ्यासक्रमात पदवी मिळविल्यानंतर शिक्षण न थांबवता पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करून पीएच.डी. मिळवली तर नवे संशोधन करण्याच्या रुपाने हा फार्मासिस्ट समाजाची आणि मानवतेची सेवा बजावू शकतो. औषधांचे संशोधन अव्याहत सुरू असते. एकदा एका औषधाचा शोध लागला म्हणजे ते औषध अगणित काळपर्यंत तसेच वापरता येते असे काही नसते. कारण अनेक औषधांच्या उपयोगाचा काळ ठरलेला असतो. काही काळपर्यंत औषधे उपयोगी पडतात. मात्र हळू हळू पर्यावरणात बदल होत गेले की, औषधे निरुपयोगी ठरायला लागतात. काही रोगांचे जंतू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडवतात की, त्यामुळे त्यांचे शरीर या औषधांचा प्रतिकार करायला लागते. म्हणूनच औषधे बाद ठरतात. अशावेळी त्या त्या रोगांचा सामना करणारी नवी औषधे शोधावी लागतात आणि हे काम फार्मासिस्ट करत असतो. एखादे औषध मुळातच शोधले गेल्यानंतर त्याच्या खूप चाचण्या घ्याव्या लागतात. त्या चाचण्या आधी प्राण्यांवर घेतल्या जातात आणि ती औषधे धोकादायक नाहीत याची खात्री पटल्यानंतर माणसावर चाचण्या घेतल्या जातात. शेवटी माणसाला ते औषध गुणकारी आहे हे सिद्ध झाल्यानंतर त्याचे फॉर्म्युलेशन करावे लागते. ते द्रवरुपात द्यावे, इंजेक्शन म्हणून द्यावे की, गोळीच्या स्वरुपात द्यावे यावर बरेच काम करावे लागते आणि नंतरच ते औषध बाजारात येत असते. इंजेक्शन, गोळी किंवा पातळ औषध तयार करताना त्यात त्या विशिष्ट औषधी घटकाशिवाय कोणती द्रव्ये वापरावीत, किती प्रमाणात वापरावीत याचाही विचार करावा लागतो. ही सारी कामे फार्मासिस्ट  करत असतात.

सध्या वैद्यकीय आणि औषध निर्मिती क्षेत्रामध्ये औषधांवर होणार्‍या संशोधनासाठी सरकारने आणि विविध औषधी कंपन्यांनी भरपूर निधी राखून ठेवलेला आहे. त्यामुळे संशोधन करू शकणार्‍या फार्मासिस्टांची मोठी गरज आहे. तेव्हा फार्मसी शाखेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि अधिकाधिक बुद्धीमान तरुणांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजेत.

Leave a Comment