‘पवार विरुद्ध पवार’ ही माध्यमांची कल्पना: दादा

मुंबई: पवार विरुद्ध पवार ही प्रसारमाध्यमांनी रंगविलेली कल्पना असून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल कोणताही राग नाही; असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यावर माध्यमातून ‘पवार विरुद्ध पवार’ या अंगाने झालेल्या वार्तांकनाचा अजित पवार यांनी समाचार घेतला.

हा कथित वाद केवळ माध्यमांनी रंगविला असून पक्षनेते या भूमिकेतून अंतिम निर्णय घेण्याचा शरद पवार यांना सर्वाधिकार आहे. आपली राजीनाम्यामागील भूमिका त्यांना मान्य आहे; असेही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान; पारदर्शक चौकशीच्या दृष्टीकोनातून अजित पवार यांनी घेतलेल्या राजीनामा देण्याच्या निर्णयाला आपले समर्थन असून त्यांचा राजीनामा मंजूर केला जाईल; अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. मात्र इतर आमदारांनी दादांच्या पाठोपाठ भावनेच्या भरात राजीनामे दिले असून ते अनावश्यक आहेत; असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Comment