सरकारच्या निर्णयाबाबत जनतेत रोष

नवी दिल्ली: आर्थिक सुधारणांबाबत लोकांच्या नाराजीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सामोरे जावे लागले. ‘भ्रष्ट प्रधानमंत्री परत जा’ अशी नारेबाजी करीत सिंग यांच्या समोरच एका व्यक्तीने त्यांचा निषेध केला.

विज्ञान भवन येथे आर्थिक विकास या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित असताना त्यांच्या भाषणापूर्वी एका व्यक्तीने अंगातील शर्ट काढून व्यासपीठावरील माईकचा ताबा घेतला आणि पंतप्रधानांच्या विरोधात नारेबाजी करण्यास सुरुवात केली. डीझेल दरवाढ आणि सिलेंडरचे रेशनिंग हे निर्णय मागे घेण्याची मागणी त्याने केली.

सुरक्षा कर्मचार्‍यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

यानंतर झालेल्या भाषणात पंतप्रधानांनी आर्थिक सुधारणांचे समर्थन केले. आर्थिक विकासाबाबत अन्य देशांकडून भारताने काही शिकण्याची आवश्यकता प्रतिपादन करतानाच देशात विदेशी गुंतवणूकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.