केंद्र सरकारला समाजवादी पार्टीचा दिलासा

नवी दिल्ली, दि. २२ – तृणमूल काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर संकटात सापडलल्या केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारला समाजावादी पार्टीने  पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्याने दिलासा मिळाला आहे. जातीयवादी शक्तीना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलयामसिह यादव यांनी घोषित केले.

तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे संख्याबळ २७३ वरून २५४ झाले असून केंद्र सरकार अल्पमतात आले आहे. मात्र,  केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देत असलेल्या समाजवादी पार्टीने केंद्र सरकारला पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. समाजवादी पार्टीकडे २२ खासदार असून केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार्‍या बहुजन समाजवादी पार्टीकडे २१ खासदार असल्याने ५४५ सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत केंद्र सरकारला तीनेशपेक्षा अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे.

मुलायमसिंह यादव यांना, केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेत आहात का, असे विचारले असता, त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात येणार नसल्याचे सांगितले. जातीयवादी शक्तीना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी समाजवादी पार्टी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सामील होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. किरकोळ व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅसवरील अनुदानाला मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा मात्र पक्षांकडून विरोध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सपा आणि बसपाचा केंद्र सरकारला पाठिंबा असून सरकारकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेसचे नेते पवनकुमार बन्सल यांनी केला आहे.

Leave a Comment