ममतांची एक्झिट

१९९८ साली केंद्रात वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हाच त्याच्या स्थैर्याची चर्चा सुरू झाली होती आणि राजकीय निरीक्षकांनी त्यांना सरकार स्थिर रहावे यासाठी समता, ममता आणि जयललिता या तीन ‘ता’ पासून सावध राहण्याचे इशारे दिले होते. या तीन ‘ता’ मधील समता पार्टी हा जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील पक्ष होता आणि फर्नांडिस सरकार कधी पाडतील हे सांगता येत नाही असे म्हटले जात होते. परंतु त्यांनी भाजपाची साथ कधी सोडली नाही. जयललिता यांनी मात्र सरकार पाडले. ते पुन्हा सत्तेवर आले आणि नंतर ममता बॅनर्जी यांनी सरकारमधून बाहेर पडून तेही सरकार अस्थिर केले. आता मनमोहनसिंग यांच्या सरकारचा पाठींबा काढून घेऊन ममता बॅनर्जी यांनी जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

त्यांनी संपु आघाडीचा पाठींबा काढून घेण्याची घोषणा केली आहे आणि येत्या शुक्रवारी आपले मंत्री राजीनामे देतील, असे म्हटले आहे. त्यांनी पाठींबा काढून घेण्याची घोषणा मंगळवारी केली आहे आणि मंत्र्यांचे राजीनामे मात्र शुक्रवारी दिले जाणार आहेत. या दरम्यानच्या काळात तडजोडीची शक्यता आहे आणि ती ममता बॅनर्जी यांना हवी आहे, असे दिसते. कारण त्यांना पाठींबा काढून घेऊन सरकार पाडायचे असते तर त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे सुद्धा मंगळवारीच दिले असते. यामुळेच काँग्रेसचे नेते सुद्धा निवांत आहेत.
शुक्रवारपर्यंत मनमोहनसिंग ममता बॅनर्जी यांची समजूत काढतील आणि प्रकरण मिटेल, अशी साधार आशा त्यांना वाटत आहे. सहाच्या ऐवजी आठ नियंत्रित दरातील गॅसच्या टाक्या, डिझेलच्या दरवाढीत थोडीशी सवलत आणि किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीबाबत राज्यांना निर्णय घेण्याची मुभा  अशा तडजोडी झाल्या की, ममता बॅनर्जींची समजूत पटण्याची शक्यता आहे. शेवटी त्यांना काय हवे आहे? देशामध्ये कधीही दरवाढ होते तेव्हा ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरतात, सरकारचा पाठींबा काढून घेण्याची धमकी देतात आणि दरवाढीच्या विरोधात खंबीरपणे उभ्या राहतात, अशी प्रतिमा त्यांना निर्माण करायची आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात डाव्या आघाडीशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना ही प्रतिमा आवश्यक वाटते. ती त्यांची राजकीय गरज आहे. म्हणून हे सारे राजकारण सुरू आहे. म्हणून शुक्रवारपर्यंत तरी मनमोहनसिंग सरकार पडते की नाही याविषयी नक्की काही सांगता येत नाही.

अर्थात ममता बॅनर्जी यांची समजूत पटली नाही तरी सरकार पडणारच नाही. कारण बहुमताची बेगमी करण्यासाठी मायावती आणि मुलायमसिंग हे दोन पर्याय अजूनही सरकारसमोर उभे आहेत. ममता बॅनर्जी अंतिमतः बाहेर पडल्या तरी यापैकी एखादा पर्याय निवडून सरकार तगू शकते. ही गोष्ट ममता बॅनर्जी यांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळे त्या शेवटच्या टोकाला जातील असे आता तरी वाटत नाही.

सरकार टिकले तरी सुद्धा सरकारच्या कामगिरीचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिलेला आहे. तो काही सुटणार नाही आणि या ठिकाणी मुळात आघाडीच्या कल्पनेविषयीच काही प्रश्न निर्माण होतात. देशामध्ये आघाडीच्या सरकारांचे युग सुरू झालेले आहे असे वारंवार म्हटले जाते. एकपक्षीय सरकार असले म्हणजेच देशाची प्रगती होते आणि आघाडीच्या सरकारामुळे ती होत नाही असे काही आढळलेले नाही. त्यामुळे आघाडीच्या सरकारविषयी आपल्याला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. मात्र अशा आघाड्या करताना केवळ संख्यांची बेरीज करून चालत नाही. संख्यांच्या बेरजांनी आघाड्या संघटित होऊ शकल्या असत्या तर भाजपा आणि काँग्रेसचीच बेरीज झाली असती आणि ती भरपूर होऊन देशाला राजकीय स्थैर्यही प्राप्त झाले असते. पण तसे होत नाही. कारण आघाडी ही केवळ संख्येची बेरीज नसून विचारांचा गुणाकार असतो आणि तसा तो झाला नाही तर काय होते याचे उदाहरण आत्ताची संपु आघाडी हेच आहे.
तृणमूल काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांची काँग्रेसशी झालेली आघाडी किंवा युती ही विचारांची युती नसून निव्वळ राजकीय सोय आहे आणि ती करताना या दोन्ही पक्षांनी केवळ सत्ता संपादनाचा हेतु डोळ्यासमोर ठेवलेला आहे. तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अगदी अलीकडे काँग्रेसमधून बाहेर पडूनच निर्माण झालेले आहे. काँग्रेसची धोरणे पसंत नसल्यामुळेच ही फाटाफूट झालेली आहे. ती खरी असेल तर तृणमूल आणि राष्ट्रवादी यांनी काँग्रेसशी कधीच हातमिळवणी करायला नको होती. तशी हातमिळवणी ही अनैतिकच आहे.

ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष संपु आघाडीत आला तेव्हा त्याच्यावर किमान समान कार्यक्रमाचे काही बंधन घालण्यात आलेले नव्हते का? कारण मनमोहनसिंग हे मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रणेते आहेत आणि या अर्थव्यवस्थेच्या दिशेने त्यांचे सरकार घेत असलेल्या प्रत्येक पावलाला ममता बॅनर्जी विरोध करत आहेत. त्यांना मुक्त अर्थव्यवस्था मंजूर नसेल तर त्यांनी मुळात या आघाडीत यायला नको होते. परंतु बहुमताची गोळाबेरीज करताना आघाडीच्या या मुलभूत तत्वाकडे खुर्चीवर डोळा ठेवून दुलर्क्ष केले गेले. त्याचे हे सगळे परिणाम आहेत.

Leave a Comment