प्राचीन भूर्जपत्रामुळे येशू बाबत पुन्हा वादास निमंत्रण

ख्रिश्चन जगतात येशू विवाहित होता का अविवाहित होता यावर गेली अनेक वर्षे वादंग सुरू असून इजिप्तमध्ये मिळालेल्या चौथ्या शतकातील जीर्ण भूर्जपत्रामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इजिप्तमधील कॉप्टीकमधून एका अज्ञान संग्रहकाकडे आलेल्या भूर्जपत्राच्या व्हिजिटिंग कार्डच्या आकाराच्या तुकड्यावरील ‘जिझस सेड टू देम- माय वाईफ ‘ या मजकुरामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून चौथ्या शतकातील हा अतिजीर्ण तुकडा रोममधील परिषदेत मंगळवारी सादर करण्यात आला.

मॅसच्युसेट, केंब्रिजमधील हायवर्ड डिव्हायनल स्कूलमधील प्रोफेसर कारेन किंग या महिला अभ्यासक व संशोधिकेने हा कपटा परिषदेत सादर केला. तिच्या मते यापूर्वी येशू विवाहित नव्हता याचा कोणताही भक्कम पुरावा मिळाला नसतानाही तो अविवाहितच होता असा ख्रिश्चनांचा दावा आहे. मात्र नवीन गॉस्पेलमुळे पुन्हा एकदा त्याबाबत शंका निर्माण झाली आहे. अर्थात हा कपटा येशू विवाहितच होता याचा पुरेसा पुरावा आहे असे म्हणता येणार नाही मात्र पूर्वीच्या काळात ख्रिश्चन लोकांचा येशू विवाहित होता असा समज होता हे नक्की सिद्ध होते.

कॅथॉलिक चर्चने येशू अविवाहित होता असाच प्रचार नेहमी केला आहे. मात्र २००३ साली प्रकाशित झालेल्या दा विंची कोड या पुस्तकाने येशूचे लग्न मॅगडलेन हिच्याशी झाले होते आणि त्याला मुलेही होती असे कथानक सत्य वाटावे अशा प्रकाराने सांगितल्यामुळे ख्रिश्चन कम्युनिटी संतप्त झाली होती. आता या नव्याने उदयास आलेल्या प्राचीन भूर्जपत्राने त्यामुळेच पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. न्यू यॉर्कच्या स्टडी ऑफ अॅन्शन्ट वर्ल्डचे संचालक रॉजर बेंगनल यांनीही हे भूर्जपत्र अस्सल असल्याचा दाखला दिला आहे. मात्र त्यावर अधिक संशोधन आणि तज्ञांचे मत घेणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

कारेन किंग हिला एका अज्ञात संग्राहकाकडून या कपट्यावरील मजकूराचे भाषांतर करण्यासाठी बोलावले गेले होते. या संग्राहकाने हा तुकडा त्याला सिरीयात मिळाल्याचे सांगितले होते. कारेन यांच्या मते ख्रिश्चन लोकांनी परंपरेने येशू विवाहित नव्हता एवढेच पुरावे जतन केले आहेत मात्र आता नव्या गॉस्पेलमुळे त्यावर अधिक प्रकाश पडू शकणार आहे.