राहुल द्रविडचा रॅट स्नेकशी सामना

बंगलोर दि. १९- भारतीय क्रिकेट संघात वॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी सामना खेळायची पाळी त्याच्यावर येतच आहे. फक्त हा सामना क्रिकेटमधील प्रतिस्पर्ध्यांबरोबर नाही तर तो आहे रॅट स्नेक बरोबर. विशेष म्हणजे असा सामना राहुलला प्रथमच खेळावा लागला आहे.

त्याचे झाले असे की बंगलोरमधील महादेवपुरा भागात असलेल्या राहुल द्रविडच्या बंगल्यात चकक चार फुटी रॅट स्नेक शिरला. राहुल आणि त्याचे कुटुंबिय यावेळी घरातच होते. या सापाचे आता करायचे काय हे चटकन राहुलला सुचेना. मात्र क्रिकेट सामन्यात तो जसा कधीच डगमगत नाही व शांत डोक्याने निर्णय घेतो तीच पॉलिसी त्याने येथेही वापरली. त्याने चटकन सर्पमित्राला फोन केला. वन्य प्राणी संरक्षण विभागाच्या लोकांनी येऊन या सापाला पकडले. हा साप बिनविषारी जातीचा आहे असे नंतर कळले.

वन्य प्राणी संरक्षण विभागातील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगलोर कितीही गजबजलेले असले तरी येथे नेहमीच साप निघतात. अगदी महाभयंकर किग कोब्रा सुद्धा. रॅट स्नेक हा अनेक वेळा घरात घुसतो. मुळात वस्ती असेल तेथे कचरा असतो, कचरा असेल तेथे उंदीर असतात आणि उंदीर हेच खाद्य असल्याने तेथे हा साप येतो. शहरात त्यांना अन्न मुबलक प्रमाणात मिळते.

Leave a Comment