मुंबई दि.१५- अॅपल आयफोन ५ ने जगभरातील ग्राहकांत उत्सुकता निर्माण केली असतानाच भारतात हा फोन कधी उपलब्ध होणार व त्याची किंमत काय असणार याची कोणतीही घोषणा अॅपलने केलेली नसली तरी भारतीय ग्राहकांना हा फोन हवा असेल तर ग्रे मार्केटचा रस्ता धरावा लागणार आहे. कारण तेथील हँडसेट डिलर हा फोन आठवड्याच्या आत हातात देण्याची गॅरंटी देत आहेतच पण त्यांनी त्यासाठी डिपॉझिट घ्यायलाही सुरवात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भारतातील या फोनची किंमत कंपनीने अजून जाहीर केलेली नाही मात्र ग्रे मार्केटमध्ये त्यासाठी ७५ हजार रूपये मोजावे लागणार आहेत व निम्मी रककम अॅडव्हान्स म्हणून भरावी लागणार आहे असेही समजते.
यूएस मार्केटमध्ये कालच हा फोन लाँच करण्यात आला आहे. अॅपलचा हा सहावा आयफोन असून त्याचे वितरण २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यूएस बरोबरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, हाँगकाँग, जपान, सिगापूर व यूकेतही हा फोन २१ सप्टेंबरपासून मिळू शकणार आहे. मात्र बुकींगची सुरवात होताच पहिल्या टप्प्याची बुकींग आत्ताच फुल्ल झाली असल्याचे अॅपल स्टोअरकडून जाहीर करण्यात आले आहे. यूएसमध्ये १६ जीबीचे व्हर्जन १९९ डॉलस, ३२ जीबीचे २९९ तर ६४ जीबीचे ३९९ डॉलर्समध्ये विकले जाणार आहे. २८ सप्टेंबरला आणखी २२ देशांत हा फोन उपलब्ध केला जाणार आहे मात्र त्यात भारताचा समावेश नाही.
ग्रे मार्केटमधील हँडसेट विक्रेते हा फोन आठवड्यात मिळवून देऊ असे सांगत असतानाच अॅपलचे रिसेलर मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात हा फोन भारतात दाखल होईल असे सांगत आहेत. मात्र किमतीबाबत तेही कोणतीही कल्पना देऊ शकत नाहीत. अर्थात प्रीबुकींग घेण्यासही या रिसेलरनी नकारच दर्शविला आहे. आणखी १५-२० दिवसांत हा फोन नक्की कधी भारतात येईल व त्याची काय किंमत असेल याचे चित्र स्पष्ट होईल असे त्यांचे म्हणणे आहे.