कोलकाता: काही काळापासून काँग्रेसशी मधुचंद्र साजरा करणार्या समाजवादी पक्षाने आता काँग्रेस पासून काडीमोड घेतली आहे. काँग्रेसला भवितव्य नसल्याचे सांगत सपचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी येथे आयोजित केलेल्या सपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा केली. आम्ही आता विरोधी पक्षात आहोत; असे त्यांनी स्पष्ट केले.
अणु उर्जा विधेयकावरून डावे पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी आणि काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुलायम सत्ताधार्यांच्या मदतीला धावले. तेव्हापासून सप आणि काँग्रेसमध्ये गुफ्तगू सुरू होते.
मात्र सध्याच्या काळात काँग्रेस सरकारवर सर्वत्र होणारी चिखलफेक पाहता त्याचे कण आपल्या अंगावर उडू नयेत; ही मुलायम यांची इच्छा आहेच. मात्र या पेक्षाही तिसर्या आघाडीची बांधणी करून आपण पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकतो; अशी स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत. केंद्रात सत्ता कोणाचीही असेल तरी किमान सत्तेच्या किल्ल्या आपल्या हाती असाव्या; या दृष्टीने पावले टाकायला मुलायम सिंगांनी सुरुवात केली आहे.
काँग्रेसशी असलेली सलगी तोडण्याबरोबरच समविचारी पक्षांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याबाबत सप धोरण आखेल; असेही मुलायम यांनी या बैठकीत स्पष्ट केले.