चीनचे उपाध्यक्ष गायब

बीजिंग: चीनचे उपाध्यक्ष शी जीन पिंग दि. १ सप्टेंबरपासून चक्क बेपत्ता आहेत. पिंग हे चीनसारख्या बलाढ्य देशाच्या अध्यक्ष पदाचे दावेदार असूनही त्यांच्या अनेक महत्वाच्या विदेशी नेत्यांबरोबरच्या बैठका रद्द करण्यात आल्याने त्यांच्याबाबतचे गूढ वाढत असून चीनी परराष्ट्र मंत्रालय याबाबत मूग गिळून आहे.

पिंग हे मागील ११ दिवसापासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयात आलेले नाहीत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, डेन्मार्कचे पंतप्रधान अशा महत्वाच्या विदेशी नेत्यांबरोबर त्यांच्या पूर्वनियोजित बैठका ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांना; उपाध्यक्ष पोहताना त्यांच्या पाठीच्या स्नायूंना इजा पोहोचल्याने ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले; तर डेन्मार्कच्या अधिकार्‍यांना बैठक रद्द होण्याचे कारण सांगण्याचे सौजन्यही चीनी राजनैतिक अधिकार्‍यांनी दाखविले नाही. पिंग यांच्या अदृश्य होण्याबाबत चीन सरकार कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करीत नाही. यामुळे केवळ चीनमध्येच नव्हे तर जगभरात राजनैतिक वर्तुळात संभ्रम आणि साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मिडीयातही उपाध्याक्षांच्या गायब होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणी पिंग यांच्या दुर्धर आजाराबाबत शक्यता वर्तवित आहेत; तर कोणी राजकीय घातपाताची शक्यताही वर्तवित आहेत.

Leave a Comment