लोडस्टोन कंपनी इन्फोसिस समूहात दाखल

बंगळूरू: आयटी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इन्फोसिस कंपनीने जागतिक क्षेत्रात व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात आघाडीवर असलेली लोडस्टोन होल्डिंग ही कंपनी १ हजार ९३० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. एक महिन्यात याबाबतच्या औपचारिकता पूर्ण होणार आहेत. इन्फोसिसचे कार्यकारी संचालक एस.डी. शिबूलाल आणि लोडस्टोनचे अध्यक्ष रोनाल्ड हाफनर यांनी या हस्तांतरणाची घोषणा केली.

झुरीच येथे मुख्यालय असलेल्या लोडस्टोन या कंपनीची सॅप प्रणालीसाठी ख्याती असून या विलीनीकरणामुळे इन्फोसिस जगात वेगाने विस्तारण्यास आणि सल्ला सेवा आणि सिस्टीम इंटिग्रेशन क्षमता विस्तारण्यास मदत होणार आहे; असे शिबूलाल यांनी स्पष्ट केले. लोडस्टोनच्या २०० ग्राहकांचा समावेश इन्फोसिसच्या ग्राहकांमध्ये होणार असल्याने इन्फोसिसच्या ग्राहकांची संख्या एक हजारावर पोहोचणार आहे.

दुसरीकडे मागील तिमाहीत महसुली उत्पन्नात इन्फोसिसला मागे टाकणार्या कोग्निझंटला मागे टाकत इन्फोसिसने आघाडी पुन्हा प्रस्थापित केली आहे. काही वर्षापूर्वी सल्ला सेवा आणि सॅप क्षेत्रातील एक्सन कंपनीच्या विलीनीकरणावरून इन्फोसिस आणि एचसीएल यांच्यात न्यायालयीन लढाई झाली. त्यात एचसीएलची सरशी झाली होती. ती उणीव लोडस्टोनच्या विलीनीकरणाने भरून निघणार आहे.