हिर्‍यांचे डिझायनिंग

हिरे, दागिने आणि हिर्‍यांचे दागिने यांचे डिझायनिंग करणे ही एक परंपरागत कला समजली जाते. जुन्या काळात काही कलाकारांनी ही कला विकसित केली आणि परंपरेने ती पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्ये ती चालत गेली. परंतु हे परंपरागत कलाकार सध्याच्या युगातील नवनव्या आणि बदलत्या फशनची गरज ओळखू शकत नाहीत. त्यामुळे या कारागिरांना नवे शिक्षण देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. या शिक्षणामुळे त्यांच्या हातातील कलेला आधुनिक रूप देता येईल. मात्र त्याचबरोबर ज्यांच्या हातात ही कला नाही किंवा परंपरेने जे कलाकार नाहीत त्यांना सुद्धा मुळातून प्रशिक्षण देऊन या कलेमध्ये पारंगत करता येऊ शकते. अशा रितीने परंपरागत कलाकार आणि नव्या या क्षेत्रात येणारे कारागिर यांना तयार करण्याची गरज सुद्धा आहे. कारण मागणी प्रचंड आहे.

१२ वी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. तीन वर्षाचे पदवी अभ्यासक्रम किंवा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम यापैकी कोणताही अभ्यासक्रम आपण निवडू शकतो. हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास तसा बराच खर्चही येतो. परंतु आर्थिक ऐपत नसणार्‍या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये एवढ्या शुल्कात छोटा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. अधिक प्रगत अभ्यासक्रम करू इच्छिणार्‍यांना १ लाख रुपये शुल्कापर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अशा विद्यार्थ्यांना दागिन्यांचे डिझायनिंग करणे एवढेच केवळ शिकविले जाते असे नाही. तर या विषयाशी संबंधित अनेक तंत्रांचा आणि कौशल्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. या विद्यार्थ्यांना ज्वेलरी ऍण्ड जेम्स डिझायनिंग हाउसेस,फॅशन हाउसेस, एक्स्पोर्ट  हाउसेसमध्ये चांगल्या नोकर्‍या मिळू शकतात. त्याशिवाय हिर्‍यांचे दागिने तयार करणार्‍या कंपन्यांना स्वत: तयार केलेले डिझाईन्स् विकून स्वतंत्र धंदाही करता येऊ शकतो. नोकर्‍या करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी चांगली कला असल्यास दरमहा १० ते १२ हजार रुपये वेतनाची नोकरी मिळू शकते. त्याशिवाय काही कंपन्यांमधून चांगल्या कारागिरांना प्रोत्साहनपर रकमाही दिल्या जातात. या कलेचे शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये जे.डी. इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन ही संस्था अग्रभागी आहे.

या संस्थेच्या शाखा मुंबई, बेंगलोर, दिल्ली येथे आहेत. त्याशिवाय एन. आय. एफ. टी., सिन जेम ज्वेलरी एज्युकेशन याही संस्था प्रशिक्षण देतात. त्यांच्याही शाखा बेंगलोर, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई येथे आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बंगलूर हीही संस्था या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या अभ्यासक्रमामध्ये महिलांना फार वाव आहे. त्यांनी या क्षेत्रात यायला काही हरकत नाही. हैदराबाद येथील अशाच एका संस्थेच्या संचालिका प्रियंका शहा यांनी सुरुवातीपासून याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार करून काम सुरू केले. त्यांच्या घरामध्ये हैदराबादच्या निजामासाठी दागिन्यांचे डिझायनिंग करण्याचे काम होते. ती कला प्रियंका शहा यांनी जतन केली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या संस्थेने ठेवलेल्या जागतिक स्तरावरच्या ज्वेलरी डिझायनिंगच्या स्पर्धेत त्यांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या मते या क्षेत्रात महिलांना प्रचंड संधी आहे.

Leave a Comment