नवी दिल्ली दि.४ – भारतात विविध दहशतवादी कारवायांमध्ये नेहमीच सक्रीय असणारी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय, शीख दहशतवादी गटांना सहकार्य करत आहे. भारतात पंजाबमध्ये दहशतवाद पुनर्जीवित करण्यासाठी आयएसआय बब्बर खालसा इंटरनॅशनलसह अन्य शीख दहशतवादी गटांना आर्थिक आणि अन्य स्वरुपाचे सहकार्य पोहोचवित आहे. केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली.
पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या बब्बर खालसाच्या म्होरक्यांसह अन्य शीख दहशतवादी गटांच्या म्होरक्यांना आयएसआय आर्थिक आणि अन्य स्वरुपाची मदत करत आहे. गृहराज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या शीख दहशतवाद्याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात भारत आणि परदेशातील शीख तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्याने सांगितले.