भिन्न रंगाच्या जुळ्या मुलींचा जन्म

लंडन दि.४ – इस्ट ससेक्स भागात राहणार्‍या पामेला फ्रेझर हिने जुळ्या मुलींना जन्म दिला ही फारशी नवलाची गोष्ट म्हणता येणार नाही. मात्र तिच्या या दोघी मुली रंगाने पूर्ण वेगळ्या आहेत आणि दहा लाखात एखादीच अशी केस असते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मिश्र रक्ताच्या संबंधातून होणार्‍या संततीत दोन्ही रक्ताचे गुणधर्म येऊ शकतात हे खरे आहे. मात्र जुळ्या संततीत अशा दोन वर्णांची मुले होणे हे दुर्मिळ असते.
 
पामेला आपल्या मुलींच्या जन्मामुळे मात्र भलतीच खूष आहे. चार आठवड्यांच्या या मुलींना घेऊन ती जेव्हा मॅटर्निटी होम मधून बाहेर पडत होती तेव्हा अनेकांनी तिच्या या जुळ्या मुलींमधील फरक पाहून तिला अनेक प्रश्न विचारले. केंडाईस ही वर्णाने काळी आहेच पण तिचे केस आणि डोळेही काळेभोर आहेत तर अलिशा युरोपियन गोरी, भुर्‍या मऊ केसांची आणि घारी आहे. पामेला आणि तिचा पती ओसवाल्ड हे दोघेही मिश्र रक्ताचे आहेत. पामेलाच्या आईत जमैकन, आयरिश आणि आफ्रिकन रक्ताचे अंश आहेत तर वडील ज्युईश आणि गोरे आहेत. ओसवाल्डचची आई जमैकन आयरिश रक्ताची आहे तर वडील जमैकन आहेत.

पामेला ही माजी बँक मॅनेजर असून तिची गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीनेच झाली होती. मात्र प्रसूती सिझेरियन पद्धतीने केली गेली. पामेलाला स्वतःलाही जुळी बहीण आहे. पामेलाच्या मते तिच्या दोन्ही मुलींनाही बहीण असल्याचा आनंद मिळणार असून त्यामुळे ती खूष आहे. अलिशा थोडी चुळबुळी आहे तर केंडाईस वडीलांसारखीच शांत आहे असे पामेलाचे म्हणणे आहे.

Leave a Comment