लष्कराने रोखली घुसखोरी

श्रीनगर: भारतीय सीमेतून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांशी सेनादलांची चकमक होऊन एक दहशतवादी आणि एक जवान मृत्युमुखी पडला.

तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सैनिकांनी रोखले. त्यानंतर घुसखोर दहशतवाद्यांनी सैनिकांवर स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी आणि एक जवान मरण पावला. मात्र दहशतवादी घुसखोरांनी माघार घेतल्याने घुसखोरीचा प्रयत्न फसला; असा दावा लेफ्टनंट कर्नल जे. एस. बरार यांनी केला.

जम्मू आणि काश्मीरच्या खोर्‍यात थंडीच्या काळात हिमवर्षावामुळे रस्ते बंद होण्यापूर्वी सीमेपलीकडून घुसखोरीचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असतात. काश्मीरमध्ये सन १९९० मध्ये अशाच प्रकारे घुसखोरी करून दहशतवाद्यांनी जातीय दंगे घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.