डेक्कन चार्जर्स संघाचा नव्याने लिलाव

नवी दिल्ली: डेक्कन चार्जर्स आयपीएल संघाचे मालक असलेली डेक्कन कार्निकल होल्डिंगज कंपनी आर्थिक अरिष्टात असल्याने बीसीसीआय या संघाचा नव्याने लिलाव करणार असून यासंबंधी चेन्नई येथे दि. १५ सप्टेंबर रोजी होणार्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

डेक्कन कार्निकल होल्डिंगज आर्थिक संकटाला तोंड देत असून डेक्कन चार्जर्स संघातील खेळाडूंचे मानधन देणेही कंपनीला अशक्य आहे. त्यामुळे या संघाचा नव्याने लिलाव करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे लिलाव करण्यात काही कायदेशीर अडचणी असल्याने या बैठकीत अंतिम निर्णय घेणे शक्य झाले नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. डेक्कन कार्निकल होल्डिंगजने ५८८ कोटी रुपयांना डेक्कन चार्जर्सची मालकी घेतली असून नव्या मालकांना ही फ्रेंचायाझी देण्यास कंपनीने १ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. कंपनी आपल्या मागणीवर आग्रही नसती तर डेक्कन चार्जर्सच्या मालकीचा प्रश्न दिल्लीच्या बैठकीतच निकाली निघाला असता असा सूत्रांचा दावा आहे.

या संघाच्या लिलावासाठी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात येणार असून इच्छुकांचे प्रस्ताव दि. १५ सप्टेंबरच्या बैठकीत उघडण्यात येतील; असेही सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment