कोळसा घोटाळ्यानंतर आता पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यावरुन संसदेत गदरोळ झाला. सरकारने राज्यसभेत हे विधेयक मांडल्यानंतर सभागृहात धक्काबुक्की झाली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या दोन सदस्यांमध्ये या वादावरुन मारहाण झाली. हा मुद्दा हक्कभंग समितीपर्यंत गेला आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. लोकसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. दुपारी दोन वाजता राज्यसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतरही प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर सर्वप्रथम कोळसा घोटाळ्यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरु होताच संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. के. नारायणसामी यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षण विधेयक राज्यसभेत मांडले. या विधेयकावरुन समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सदस्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. त्यांच्यामध्ये धक्कबुक्कीही झाली. सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी विधेकाला विरोध केला आणि ते वेलकडे जाण्यास निघाले. बसपा खासदारांनी त्यांना अडविले. बसपचे सदस्य अवतार सिंग आणि अग्रवाल यांच्यात त्यावेळी धक्काबुक्की झाली. वरीष्ठ खासदारांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. अग्रवाल यांनी सिंग यांची हक्कभंग समितीकडे तक्रार केली आहे.