तेहरान दि.२९- इराणने सुरू ठेवलेल्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाला चाप बसावा म्हणून भारतासह अन्य देशांनी इराणकडून तेल खरेदी करू नये या अमेरिकेच्या दबावाला फारशी किंमत न देता भारतच इराणी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असेल असे संबंधित अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग सध्या इराणच्या दौर्यावर असून त्यात ते अध्यक्ष अहमदीनेजान यांच्यासह अनेक वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.
भारतच इराणी क्रूडचा सर्वात मोठा ग्राहक
अमेरिकेने इराण कडून तेल खरेदी करू नये असे निर्बंध घातल्यानंतर दिल्लीला तेहरानमधून होणारा क्रूडचा पुरवठा थोडा घटला आहे मात्र तरीही इराणच भारताचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल पंतप्रधानांच्या भेटीत चर्चा होणार आहेच मात्र जगातील सर्वच देशांना शांततेसाठी अणु कार्यक्रम राबविण्याचा हक्क असल्याचे मत भारताने व्यकत केले आहे. इराणकडून पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तेल कंपन्यांना ज्या कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी येत होत्या त्या सोडविण्यात आल्या असल्याचेही संबंधित अधिकार्यांनी सांगितले.
अणु कार्यक्रम राबविताना कांही आंतरराष्ट्रीय कायद्याची बंधने पाळावी लागतात. इराणने त्यांचा अणू कार्यक्रम पाहण्यासाठी येणार्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना परवानगी नाकारल्याने अडचण निर्माण झाली होती मात्र आता इराण आपला विचार बदलत आहे असेंही या अधिकार्यांनी सांगितले.
इराणने त्यांच्या देशाच्या बँकांना भारतात शाखा उघडू देण्यासाठी परवानगी मागितली आहे त्यासंबंधी माहिती देताना हे अधिकारी म्हणाले की कांही तांत्रिक मुद्दे स्पष्ट करून घेतल्यानंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
